गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंड हा भारतीय कुटुंबांसाठी संपत्ती उभारण्याचा एक लोकप्रिय मार्ग बनला आहे. विविधता, व्यावसायिक व्यवस्थापन आणि अगदी लहान मासिक रकमेपासून गुंतवणूक सुरू करण्याची सोय, ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. तरीही पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना सुरुवात कुठून करावी, कोणता फंड निवडावा आणि गुंतवणुकीनंतर तिची काळजी कशी घ्यावी, असे प्रश्न पडतात. आर्थिक वर्ष 2026-27 च्या नियमांच्या आधारे या सर्व प्रश्नांची उत्तरे या मार्गदर्शकात दिली आहेत.
हा लेख इंग्रजीत वाचा: Mutual Funds for Beginners: A Complete Guide for Indian Investors (2026)
महत्त्वाचे मुद्दे
- म्युच्युअल फंड अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून शेअर्स, बॉण्ड्स आणि इतर रोख्यांमध्ये गुंतवतो. त्याचे व्यवस्थापन अनुभवी फंड मॅनेजर करतात.
- पैशांची गरज केव्हा आहे त्यानुसार फंड निवडा: अल्प मुदतीच्या उद्दिष्टांसाठी डेट फंड, मध्यम मुदतीसाठी हायब्रिड फंड आणि दीर्घ मुदतीसाठी इक्विटी फंड.
- SIP मुळे शिस्त लागते, खरेदीचा सरासरी खर्च समतोल राहतो आणि चक्रवाढीचा फायदा मिळतो. जितकी लवकर सुरुवात, तितके चांगले.
- गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आरोग्य विमा, टर्म विमा आणि आपत्कालीन निधीची तरतूद करा.
- वर्षातून एकदा पोर्टफोलिओचा आढावा घ्या आणि बाजारातील चढ-उतारांतही गुंतवणूक टिकवून ठेवा.
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूक माध्यम आहे. अनेक गुंतवणूकदारांची बचत एकत्र करून ती एका ठरावीक उद्दिष्टानुसार गुंतवली जाते. योजनेनुसार हे पैसे शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्समध्ये, सरकारी रोखे, कॉर्पोरेट बॉण्ड्स, ट्रेझरी बिल्स यांसारख्या डेट साधनांमध्ये, किंवा यांच्या मिश्रणात आणि सोन्यासारख्या इतर मालमत्तांमध्ये गुंतवले जातात.
गुंतवणूक केल्यावर तुम्हाला योजनेची युनिट्स तिच्या NAV (नेट ॲसेट व्हॅल्यू, म्हणजे प्रति युनिट निव्वळ मालमत्ता मूल्य) नुसार मिळतात. NAV दर कामकाजाच्या दिवशी जाहीर होतो आणि गुंतवणुकीचे मूल्य वाढले किंवा घटले की तोही बदलतो. भारतात म्युच्युअल फंडांचे नियमन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) करते. या क्षेत्राची सविस्तर माहिती AMFI च्या amfiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?
- व्यावसायिक व्यवस्थापन: अनुभवी फंड मॅनेजर आणि संशोधन पथके गुंतवणुकीची निवड आणि देखरेख करतात.
- विविधता: लहान रक्कमही अनेक रोख्यांमध्ये विभागली जाते, त्यामुळे एखाद्या कंपनीची किंवा बॉण्डची कामगिरी खराब झाली तरी परिणाम मर्यादित राहतो.
- लहान रकमेपासून सुरुवात: मासिक SIP लहान रकमेने सुरू करून उत्पन्न वाढेल तशी वाढवता येते.
- तरलता: ओपन-एंडेड योजनांची युनिट्स कोणत्याही कामकाजाच्या दिवशी विकता येतात; फक्त ELSS फंडांना तीन वर्षांचा लॉक-इन असतो.
- अधिक परताव्याची शक्यता: दीर्घ मुदतीत इक्विटी म्युच्युअल फंड मुदत ठेवी आणि पारंपरिक विमा योजनांपेक्षा अधिक परतावा देऊ शकतात, मात्र परताव्याची कोणतीही हमी नसते.
- पारदर्शकता: NAV दररोज जाहीर होतो, पोर्टफोलिओ नियमितपणे प्रसिद्ध होतात आणि खर्च व माहिती-प्रकटीकरणावर SEBI चे नियंत्रण असते.
लक्षात ठेवाव्यात अशा मर्यादा
- बाजारातील जोखीम: गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते, विशेषतः अल्प मुदतीत इक्विटी फंडांमध्ये.
- पोर्टफोलिओची पुनरावृत्ती: एकाच प्रकारच्या दोन फंडांमध्ये अनेकदा तेच शेअर्स असतात. त्यामुळे अनेक फंड घेतल्याने विविधता दिसते तितकी वाढत नाही.
- खर्च: सक्रियपणे व्यवस्थापित फंड एक्स्पेन्स रेशो आकारतात. रेग्युलर प्लॅनमध्ये वितरकाचे कमिशनही समाविष्ट असते; डायरेक्ट प्लॅनमध्ये ते नसते.
इंडेक्स फंड आणि ETF कमी खर्चात एखाद्या निर्देशांकाचे अनुकरण करतात आणि या दोन्ही अडचणी कमी करतात.
म्युच्युअल फंडांचे प्रकार
इक्विटी फंड
इक्विटी फंड प्रामुख्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि दीर्घकालीन वाढीचा मुख्य स्रोत ठरतात. कंपन्यांच्या आकारानुसार (मार्केट कॅपिटलायझेशन) त्यांचे वर्गीकरण होते. SEBI नोंदणीकृत कंपन्यांना मार्केट कॅपनुसार क्रमांक देते आणि AMFI ही यादी वर्षातून दोनदा प्रसिद्ध करते.
| प्रकार | गुंतवणूक कुठे होते | जोखीम आणि परतावा |
|---|---|---|
| लार्ज कॅप | किमान 80% पहिल्या 100 कंपन्यांमध्ये | तुलनेने स्थिर |
| मिड कॅप | किमान 65% क्रमांक 101 ते 250 मधील कंपन्यांमध्ये | अधिक वाढीची शक्यता, अधिक चढ-उतार |
| स्मॉल कॅप | किमान 65% क्रमांक 251 पासून पुढील कंपन्यांमध्ये | सर्वाधिक वाढीची शक्यता आणि सर्वाधिक चढ-उतार |
| मल्टी कॅप | लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप प्रत्येकी किमान 25% | सर्व आकारांच्या कंपन्यांमध्ये समतोल |
| फ्लेक्सी कॅप | किमान 65% इक्विटी, कोणत्याही आकाराच्या कंपन्यांमध्ये | मिश्रण फंड मॅनेजर ठरवतो |
| ELSS | किमान 80% इक्विटी, 3 वर्षांचा लॉक-इन | कर वजावट फक्त जुन्या कर प्रणालीत |
| सेक्टोरल आणि थिमॅटिक | एकाच क्षेत्राच्या किंवा संकल्पनेच्या कंपन्या | केंद्रित गुंतवणूक, सतत देखरेख आवश्यक |
डेट फंड
डेट फंड निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात आणि स्थिरता व अल्प मुदतीच्या उद्दिष्टांसाठी उपयुक्त ठरतात. यात दोन प्रमुख जोखमी असतात: व्याजदराची जोखीम, कारण व्याजदर वाढले की बॉण्डच्या किमती घसरतात; आणि पत जोखीम (क्रेडिट रिस्क), म्हणजे कर्जदाराने परतफेड न करण्याची शक्यता. लिक्विड फंड (काही दिवस ते काही महिने), शॉर्ट ड्युरेशन फंड (अल्प मुदतीची उद्दिष्टे व आपत्कालीन निधी), कॉर्पोरेट बॉण्ड फंड, गिल्ट फंड (सरकारी रोखे) आणि डायनॅमिक बॉण्ड फंड हे प्रमुख प्रकार आहेत. अधिक परताव्यासाठी कमी पतमानांकनाच्या बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या क्रेडिट रिस्क फंडांपासून नवीन गुंतवणूकदारांनी दूर राहणेच योग्य.
हायब्रिड फंड आणि इतर प्रकार
हायब्रिड फंड इक्विटी, डेट आणि काही वेळा सोने यांच्या मिश्रणात गुंतवणूक करतात, त्यामुळे केवळ इक्विटीच्या तुलनेत चढ-उतार कमी होतात. कन्झर्व्हेटिव्ह हायब्रिड, ॲग्रेसिव्ह हायब्रिड, बॅलन्स्ड ॲडव्हांटेज, मल्टी-ॲसेट आणि इक्विटी सेव्हिंग्ज फंड हे त्यांचे प्रकार आहेत. याशिवाय इंडेक्स फंड आणि ETF कमी खर्चात Nifty 50 सारख्या निर्देशांकाचे अनुकरण करतात, तर फंड ऑफ फंड्स इतर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात.
ओपन-एंडेड की क्लोज-एंडेड? ओपन-एंडेड योजनांमध्ये कोणत्याही कामकाजाच्या दिवशी गुंतवणूक आणि पैसे काढणे शक्य असते. क्लोज-एंडेड योजना (उदा. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन) फक्त सुरुवातीला पैसे स्वीकारतात आणि मुदतपूर्तीपूर्वी त्यांची युनिट्स फक्त शेअर बाजारात विकता येतात, जिथे खरेदीदार कमी असतात. नवीन गुंतवणूकदारांसाठी ओपन-एंडेड योजनाच अधिक योग्य.
कोणत्या उद्दिष्टासाठी कोणता फंड?
| पैशांची गरज केव्हा | योग्य फंड | उद्दिष्टांची उदाहरणे |
|---|---|---|
| 1 ते 2 वर्षांत | क्रेडिट जोखीम नसलेले लिक्विड आणि शॉर्ट ड्युरेशन डेट फंड | आपत्कालीन निधी, नियोजित खरेदी, शाळेची फी |
| सुमारे 3 ते 6 वर्षांत | बॅलन्स्ड ॲडव्हांटेज, मल्टी-ॲसेट किंवा इक्विटी सेव्हिंग्ज सारखे हायब्रिड फंड | स्वतःच्या बचतीतून घराचे डाउन पेमेंट, मुलांच्या शिक्षणातील टप्पा |
| 10 वर्षे किंवा अधिक | इंडेक्स, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप इक्विटी फंड | निवृत्ती, मुलांचे उच्च शिक्षण |
गुंतवणुकीपूर्वी तीन आवश्यक गोष्टी
- आरोग्य विमा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी.
- टर्म विमा, जर कोणी तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असेल तर.
- आपत्कालीन निधी, बचत खाते आणि लिक्विड किंवा शॉर्ट ड्युरेशन डेट फंडात.
तितकेच महत्त्वाचे: फक्त स्वतःच्या बचतीचीच गुंतवणूक करा. पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड किंवा मालमत्तेवर कर्ज काढून म्युच्युअल फंडात कधीही गुंतवणूक करू नका. बाजाराशी निगडित परतावा अनिश्चित असतो, पण कर्जाचे हप्ते निश्चित असतात.
SIP ची ताकद
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये दर महिन्याला ठरावीक तारखेला ठरावीक रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप गुंतवली जाते. त्यामुळे बचतीला शिस्त लागते; किमती कमी असताना अधिक युनिट्स आणि जास्त असताना कमी युनिट्स मिळतात, त्यामुळे खरेदीचा सरासरी खर्च समतोल राहतो (रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग); आणि चक्रवाढीमुळे पैसा जितका जास्त काळ गुंतवलेला राहतो, तितका वेगाने वाढतो.
उदाहरणार्थ, एखाद्या इक्विटी फंडात ₹5,000 ची मासिक SIP, वार्षिक 12% परताव्याच्या उदाहरणादाखल गृहीतकावर:
| गुंतवणुकीचा कालावधी | एकूण गुंतवणूक | कालावधीअखेर अंदाजे मूल्य |
|---|---|---|
| 10 वर्षे | ₹6 लाख | ₹11.6 लाख |
| 20 वर्षे | ₹12 लाख | ₹50 लाख |
| 30 वर्षे | ₹18 लाख | ₹1.76 कोटी |
वयाच्या 25 व्या वर्षी ही SIP सुरू करणाऱ्याकडे 55 व्या वर्षी सुमारे ₹1.76 कोटी जमा होऊ शकतात. 35 व्या वर्षी सुरुवात करणाऱ्याला 55 पर्यंत तेवढीच रक्कम उभी करण्यासाठी दरमहा सुमारे ₹17,700 गुंतवावे लागतील, म्हणजे एकूण सुमारे ₹42 लाख; तर लवकर सुरुवात करणाऱ्याची एकूण गुंतवणूक केवळ ₹18 लाख. हीच चक्रवाढीची ताकद. हे आकडे केवळ उदाहरणादाखल आहेत; परताव्याची कोणतीही हमी नाही.
म्युच्युअल फंड योजना कशी निवडावी
- उद्दिष्टे आणि जोखीम क्षमतेपासून सुरुवात करा. अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या उद्दिष्टांची यादी करा.
- आधी फंडाचा प्रकार निवडा, मग योजना.
- मागच्या वर्षीच्या सर्वोत्तम फंडाच्या मागे धावू नका. पाच किंवा अधिक वर्षे तेजी आणि मंदी दोन्हीत आपल्या बेंचमार्क आणि समकक्ष फंडांपेक्षा सातत्याने चांगली कामगिरी केलेल्या योजना पाहा.
- जोखमीचे निकष तपासा. इक्विटी फंडांसाठी स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा आणि शार्प रेशो; डेट फंडांसाठी मॉडिफाइड ड्युरेशन, पतगुणवत्ता आणि पोर्टफोलिओचे केंद्रीकरण.
- खर्चाची तुलना करा. कमी एक्स्पेन्स रेशोचा दीर्घ मुदतीत मोठा फायदा होतो.
- विचारपूर्वक विविधता ठेवा. प्रत्येक प्रकारात एक-दोन चांगल्या योजना पुरेशा आहेत.
डायरेक्ट की रेग्युलर प्लॅन? दोन्हींचा पोर्टफोलिओ एकच असतो, पण रेग्युलर प्लॅनमध्ये वितरकाचे कमिशन समाविष्ट असल्याने एक्स्पेन्स रेशो जास्त असतो. जे गुंतवणूकदार स्वतः फंड निवडू आणि त्यांचा आढावा घेऊ शकतात, त्यांना डायरेक्ट प्लॅनच्या कमी खर्चाचा फायदा होतो. मार्गदर्शन हवे असणाऱ्यांनी SEBI-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा पात्र वितरकाची मदत घ्यावी.
आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये म्युच्युअल फंडांवरील कर
| फंडाचा प्रकार | अल्पकालीन नफा | दीर्घकालीन नफा |
|---|---|---|
| इक्विटी-आधारित फंड (किमान 65% भारतीय इक्विटी) | 12 महिन्यांपर्यंत: 20% कर | 12 महिन्यांहून अधिक: वर्षात ₹1.25 लाखांपेक्षा अधिक नफ्यावर 12.5% कर |
| 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर घेतलेले डेट फंड (65% पेक्षा अधिक डेट) | तुमच्या आयकर स्लॅबनुसार | कालावधी कितीही असला तरी स्लॅब दरानेच कर |
कर फक्त युनिट्स विकताना किंवा स्विच करताना लागतो, गुंतवणूक टिकवून ठेवताना नाही. ELSS मधील गुंतवणुकीवर आयकर कायदा 2025 च्या कलम 123 (पूर्वीचे कलम 80C) अंतर्गत वजावट फक्त जुन्या कर प्रणालीत मिळते.
नवीन गुंतवणूकदारांच्या सामान्य चुका
- एक-दोन वर्षांत लागणारे पैसे इक्विटी फंडात गुंतवणे.
- फक्त मागच्या वर्षीच्या परताव्यावरून फंड निवडणे.
- सारखा पोर्टफोलिओ असलेल्या अनेक योजना घेणे.
- बाजार घसरल्यावर घाबरून SIP बंद करणे किंवा पैसे काढून घेणे.
- कर्ज काढून गुंतवणूक करणे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
म्युच्युअल फंड सुरक्षित आहेत का?
म्युच्युअल फंडांचे नियमन SEBI करते आणि तुमचे पैसे फंड हाउसच्या स्वतःच्या मालमत्तेपासून वेगळे, योजनेच्या नावावर ठेवले जातात. मात्र त्यांचे मूल्य बाजारानुसार बदलते आणि परताव्याची हमी नसते. उद्दिष्टाच्या कालावधीनुसार फंड निवडणे हा जोखीम सांभाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
SIP सुरू करण्यासाठी किती रक्कम लागते?
अनेक योजनांमध्ये दरमहा काहीशे रुपयांपासून SIP सुरू करता येते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे लवकर सुरुवात करणे आणि उत्पन्न वाढेल तशी रक्कम वाढवणे.
इक्विटी फंडात किती काळ गुंतवणूक ठेवावी?
दहा किंवा अधिक वर्षे दूर असलेल्या उद्दिष्टांसाठी इक्विटी फंड सर्वाधिक योग्य आहेत. कमी कालावधीत तोट्याची जोखीम लक्षणीयरीत्या जास्त असते.
मी केव्हाही पैसे काढू शकतो का?
ओपन-एंडेड योजनांमधून हो, साधारणपणे एक ते तीन कामकाजाच्या दिवसांत. ELSS ला तीन वर्षांचा लॉक-इन असतो आणि काही योजना ठरावीक कालावधीपूर्वी पैसे काढल्यास एक्झिट लोड आकारतात.
संबंधित लेख: मराठीतील सर्व लेख, Asset Allocation Strategy for Middle-Class Investors (इंग्रजी), आणि Hybrid, Balanced Advantage and Multi-Asset Funds Explained (इंग्रजी).
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
अस्वीकरण: दर्शवलेले परतावे केवळ उदाहरणादाखल असून त्यांची कोणतीही हमी नाही. हा लेख नोव्हेंबर 2026 पर्यंत उपलब्ध सार्वजनिक नियमांवर आधारित आहे, जे बदलू शकतात. ही केवळ सर्वसाधारण माहिती आहे, वैयक्तिक गुंतवणूक किंवा कर सल्ला नाही. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी पात्र सल्लागाराचा सल्ला घ्या. या लेखावर अवलंबून राहिल्याने होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी Mungekar Wealth जबाबदार नाही.


